गरीबी तील श्रीमंती
काल सकाळी 9 च्या सुमारास फोनची घंटी वाजली. मी फोन उचलला तर समोरून आवाज आला. की,” आज माझी आई कामाला येणार आहे जी.” एवढे ऐकून माझ्या लक्षात आले की,हा आवाज माझ्या घरी काम करणाऱ्या कामवाली बाई च्या मुलीचा आहे.जी बारावीला शिकत होती.
लॉक डाऊन च्या पहिल्या टप्प्या पासूनच स्वमर्जीने सुट्ट्या वर असणारी माझी कामवाली बाई येणार हे ऐकून, खरंच मी सुखावून गेली होती. त्यामुळे मी माझे किचन लवकरच आवरले.
दुपारी एक दीड च्या दरम्यान दरवाजाची घंटी वाजताच , माझ्या डोक्यात आले की, बाई आली असेल. व तीच होती. ती आत मध्ये येताच, मी तिला विचारले, “काय बाई कशा आहात”त्यावर ती उत्तर देत घरात आली व म्हणाली. ताई कोरोना ने तर गरिबांचे जगणेच मुश्कील करून टाकले मी विचारले ,’ काय झाले’ तर ती म्हणाली ….
तुम्हाला तर माहीतच आहे ,माझ्या घरी ” मी घर कामे करते व माझा मुलगा इलेक्ट्रिक च्या दुकानात कामाला आहे” म्हणून त्याने शाळा ही सोडली, आम्ही कसेबसे माझ्या मुलीला शिकवत आहोत, यंदा ती बारावीत आहे.या लॉक डाऊन च्या काळात आमचे दोघांचेही काम बंद आहे, आवक नसल्यामुळे घरात फारच चणचण होती .धान्य संपत आले होते व फारसे पैसेही जवळ नव्हते.
त्यामुळे राशन च्या दुकानात गेले. तर तेथे प्रत्येकी 5 किलो तांदूळ जास्त मिळाले. व तिथे कळले की, लॉक डाऊन संपेपर्यंत मिळेल हे ऐकून थोडे हायसे वाटले.
परंतु माझ्या शेजारी एक परप्रांतीय कुटुंब राहत होते त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षाही अवघड झाली होती, काम थांबले होते आणि ठेकेदारा कडून ही थकित मजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे खाण्याचे वांदे झाले होते घरातील मुले खाण्यासाठी तगादा लावत होते, यावरून मला त्यांच्या परिस्थितीचा अंदाज आला. म्हणून मी मला मिळालेल्या मदतीतून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
मला मिळालेल्या धान्या मधून शेजारी राहणाऱ्या मजूर कुटुंबाला अर्धे धान्य दिले त्यामुळे परप्रांतीय परिवाराच्या घरची चूल पेटली होती.
गरिबीतही तिने दाखविलेली ही श्रीमंती शब्दात व्यक्त होणारी नाही . घरी अठराविश्व दारिद्र्य असतानाही दाखविलेला हा दानशूरपणा पोट भरलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
एकीकडे स्वार्थापोटी घरात धान्य असूनही साठवणूक करणारा वर्ग ,एकीकडे भरपेट खाऊन शिळे अन्न बाहेर टाकणारा वर्ग या दोन्हीच्या तुलनेत या बाईच्या मनाची श्रीमंती मला श्रेष्ठ वाटते.
गरजूंसाठी असलेल्या धान्यावर डल्ला मारणारे काही महाभाग दिसून येतात.गरिबीच्या नावावर धान्य वाटून प्रसिद्धी पावणारे अनेक मुखवटा धारकांनी त्यांच्या तोंडचे धान्य पळविले होते.
मृतकाच्या टाळूवरील लोणी खाण्यातही या संधी साधू लोकांनी या काळात मागेपुढे पाहिले नाही.
गरिबीतून श्रीमंती यामुळे च आज माणूस पण,व संवेदना टिकून आहे. समाजव्यवस्था आणि संंस्कृती यांच्यामुळेच अबाधित आहे.
कामवाल्या बाईचे हे सर्व बोलणे ऐकून माझे मन हेलावले. व माझ्या मनात तिच्याविषयी असणारा सन्मान आणखी वाढला व वाटले की, हीच आहे खरी गरिबीतील श्रीमंत……
धन्यवाद
ह्यालाच माणुसकी म्हणतात.
धन्यवाद
श्रीमंतांनी अशा लोकांन कडून कही मणुस्कीचे धडे घेतले पाहिजे 🙏 ताई खूप छान होता लेख.
धन्यवाद
*गरिबीतील श्रीमती*
खऱ्या माणुसकीचे दर्शन…… मनाची श्रीमंती………
सलाम त्यांच्या सद्वविचाराला💐💐💐💐💐💐💐