जीवघेणे नैराश्य

यशाच्या शिखरावर असलेल्या केवळ 34 वर्षीय सुशांतच्या आत्महत्येने केवळ सिनेसृष्टीच नव्हे, तर त्याच्या चाहत्यांबरोबर समाजमनही हादरून गेले आहे. पैसा,यश आणि प्रतिष्ठा हाती असतांनाही सुशांतने आत्महत्येचा मार्ग का निवडला. हे अद्यापही न सुटलेल कोडं आहे.हे त्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलल्या जात आहे. परंतू ताण व त्यातून आलेल्या नैराश्यातून होणा-या आत्महत्या समाजमनाला हादरून सोडणा-या आहे. त्यामुळे नैराश्य या मानसिक आजारावर वेळीच उपाय होणे काळाची गरज आली आहे. अन्यथा भविष्यात अन्य आजारापेक्षा नैराश्यातून होणा-या आत्महत्येचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे चित्र समाजासाठी नक्कीच धोकादायक ठरणारे आहे.
नैराश्य हे मानसिक अवस्था आहे. त्यातून नकारात्मक भावना वाढत जाऊन अखेरच्या टप्प्यात जगण्याचा आनंदच नष्ट झाल्याने माणुस आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतो.

नैराश्य कोणालाही येऊ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअर वर परिणाम होतो. त्याचा नात्यावर ,कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो.
आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे आत्महत्या.सध्याच्या परिस्थितीत तरूण मुलांतील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे आत्महत्या.एवढे सगळे परिणाम असताना मात्र त्याकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात.
नैराश्य हा असा आजार आहे ज्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार उपलब्ध आहेत. नैराश्य काय आहे हे समजुन घेणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचाराबाबत माहिती करून घेणे खूप मह्त्त्वाचे आहे. सर्वात मह्त्त्वाचे आहे ते म्हणजे नैराश्याशी निगडित कलंकीत भावना दुर करणे गरजेचे ठरते.
ज्यामुळे जास्तीत जास्त लोक नैराश्यासाठी मदत घेतील.
गरिबी, बेरोजगार आयुष्यातील मोठ्या घटना/ मानसिक आघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, ब्रेकअप, शारीरिक आजार तसेच दारू किंवा ड्रग्जचे व्यसनापासून नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. परंतु असे काही कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे. मेंदूतील रासायनिक बदलामुळे नैराश्य येऊ शकते.
यासाठी मनोविकारतज्ञास दाखवल्यास आपल्याला लोक वेडे समजतील ही भीती व कलंकीत भावणेमुळे बरेच लोक उपचार घ्यायचे टाकतात.ही वस्तुस्थीती आहे.

लॉकडाऊनमुळे देश-विदेशातील युवक,नोकरदार ,व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी घरी परतले आहे. तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला. भविष्य कसे असेल ,याचा काहीच अंदाज नाही. अनेकांचा रोजगार हिरावला गेला.तर कित्येकजणाच्या वेतनात कपात झाली आहे.भरपूर पगारातून अवास्तव गरजांची पुर्तता करतांना नक्कीच ताण,तणाव वाढू शकतो.
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर,स्पर्धा परिक्षेला समोरे जाणा-यांना विद्यार्थ्याना बसला आहे. त्यांच्या स्वप्नांचाच चुराडा झाला आहे. यातील अनेक जण हे एम.पी.एस.सी.च्या वर्ग-1 वर्ग -2 ची पदे कैच करण्याच्या उंबरठ्यावर असतांना झेप घेण्यापुर्वीच ते कोसळले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी पुण्यावरून घरी परतले आहे.अभ्यासिका बंद झाल्याने नेमके या दिवसात काय करायचे? हा सतावणारा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याच्या मनाची होणारी घुसमट ही वरकरणी कुणालाही कळणारी नाही. स्पर्धा परिक्षेचे परिश्रम हिमालयाच्या टोकावर पोहचले असतांना,तेथून खाली हाताने परतण्याचे दुख मोठे आहे. ही मनाची स्थीती कुणालाही कळणारी नाही. मन कुठे मोकळे करायचे .सर्वचजण आपल्याकडे आशादायी नजरेने बघणारे, स्वत:पेक्षा इतरांवर अधिक विश्वास ठेवणारे.या विश्वासांच्या आेझ्यामुळेच मन मोकळे न झाल्याने चिंताचे व विचारांचे व्दंद हे मनाला कमकुवत करीत असते.
सद्यस्थीतीत दोन पैसे हाती आले.यश आले.समाजात टेटस प्रतिष्ठा वाढले की, मन मोकळे करण्याचे ठिकाणे कमी होते. किंबहुना इतरांनापुढे मनातले दुख सांगीतल्यास ,ऐकूण घेणारे पुष्कळ मिळतील व समजून घेणारे अगदी थोडे मिळतील. एवढा मोठा माणूस मानसिक रूग्ण आहे,या विचारानेही तो व्यक्त होत नाही. समाजाच्या दुर्बल व गरिबीच्या ठिकाणी मात्र सुख-दुखे लवकर माहित होतात. गावभर पसरते. रडण्यातून किंवा ती लवकर व्यक्त होत असल्याने त्यातून मार्ग निघत असतात.आणि नैराश्यच्या सव्वोच्च स्थानापर्यंत पोहचण्याचे प्रमाणही कमीच असते. परंतू अलिकडे सर्वात घुमसट होते ती सर्वसामान्य ,प्रतिष्ठीत सेलीब्रिटींची. कारण ही मंडळी आयडल पर्सनल असतात.त्यामुळे कुणाकडे भावना व्यक्त करणार यातून विचारातून स्वत:ला संपविण्यापर्यंत मजल गाठतात. उदा.भैयू महाराज, या आध्यामिक गुरूंनी स्वत:वर गोळ्या झाडून संपविले. राजकारणी,व नेत्यांना मानसिक धैर्य देणारे,आध्यामिकेतून नैराश्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविणा-यांनी टोकाचे पाऊल का उचलावे.हा अनुतर्रीत प्रश्न आहे.

आज घरांमध्ये कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. मुले मोबाईल मध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील चढ-उतार यापासून ते अनभिज्ञ असते. बालमनावर घरात संस्कार होतात परंतु त्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी, आयुष्यातील संघर्ष, यश-अपयश याचा खंबीरपणे कसा सामना करायचा मानसिक दृष्ट्या कसे खंबीर राहायचे याचे बाळकडू देत नाही. तसेच बालवयापासूनच बालकांना अति लाडा पायी नकार पचवणे शिकवले जात नाही. हे सर्व कारणे भविष्यात धोकादायक ठरू शकतात.

जगामध्ये निराशेपोटी होणाऱ्या आत्महत्या चे प्रमाण चिंतनीय आहे. भारतातही याचे प्रमाण वाढताना दिसून येते. हा भविष्याचा धोका वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे झाले आहे .

आपल्या मनातील दुःख,वेदना, समस्या मनातच न ठेवता इतरांना सांगण्याची सवय करा. त्यातून तुमचे मन हलके होऊन मानसिक तान ही कमी होऊ शकतो. व तुम्ही एक सुंदर आयुष्य जगू शकता. व हे सुंदर आयुष्य जगण्यात इतरांनाही निश्चितच मदत करू शकता .

धन्यवाद

5 thoughts on “जीवघेणे नैराश्य

 • June 16, 2020 at 7:41 am
  Permalink

  nice👍👌

  Reply
 • June 16, 2020 at 12:00 pm
  Permalink

  मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, आपण ज्यांना सर्वज्ञ, अभ्यासू आणि खंबीर व्यक्ती मानतो, आणि म्हणून आपण त्यांना गुरूही मानतो, अशी माणसंही एवढी अविचारी का होत असतील? जगात दुःखं आहेत, समस्या आहेत पण एखाद्याच्या आयुष्यापेक्षा त्या नक्कीच मोठ्या नाहीत. कोणतंही दुःख किंवा समस्या ही आपल्या आयुष्याचा भाग असते, ते दुःख किंवा ती समस्या म्हणजे आपलं आयुष्य नसतं, हे आता आपल्याला कळलं पाहिजे.
  काही काही लोक नवराबायको मध्ये पटत नाही, म्हणून आत्महत्या करायला उठतात, मी म्हणतो तुमचं पटत नाही ना, मग द्या ना सोडून, जीवन संपवण्यापेक्षा रिलेशन संपवा ना! संपवा रिलेशन आणि करा नवी सुरुवात. जगात सगळं आपल्या मानासारखंचं कसं होईल? एखादा व्यवसाय, एखादी नोकरी आपल्याला लाभली नाही, तर आपण ती बदलतोच की नातेसंबंधाचंही असंच असतं. एखादं नातं नाही लाभलं, तर घाला माती आणि चाला पुढं, नवी नाती मिळतील तुम्हांला, जग खूप मोठं आहे. आणि नाही मिळाली तर एकट्यानं जगा. एकट्यानं जगा पण जगा.
  काही लोक कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करतात, तुम्ही कर्ज काढता त्यावेळी तुमच्याकडे काही असेट्स असल्याशिवाय बँक तुम्हांला कर्ज देते का? विका ती मालमत्ता आणि नव्यानं सुरुवात करा. काही मुलं परीक्षेत मार्क कमी मिळाले, म्हणून स्वतःला संपवतात तर कोणी आजाराला कंटाळून, मला एवढंच म्हणायचं आहे की, शिक्षण, मार्क्स हे आपल्याला आयुष्य चांगलं जगण्यासाठी उपयोगी असतात. पण शिक्षण मिळालं नाही, तर माणूस जगूचं शकत नाही, असं थोडंच आहे? आपले आजी आजोबा कुठं शिकले होते? तरीही त्यांचं आयुष्य चांगलंच गेलं की. आणि आजाराचं म्हणाल तर तुम्ही रस्त्यावर उतरलात की, तुम्ही कितीही काळजी घेतलीत, तरी एखादी धडक तुम्हांला बसू शकतेच! आजाराचंही तसंच आहे.
  शरीर आणि मन आहे, म्हटल्यावर एखादी व्याधीही तुमच्या बरोबर येणार, डिप्रेशन येणार, एकदा हे मान्य केलं की, मग सगळं सोपं होऊन जातं, डिप्रेशन हाही एक आजारचं आहे, हा आजार आहे आणि यातून बरे होण्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात कसलाही कमीपणा बाळगण्याचं कारण नाही.
  सगळ्या आत्महत्यांच्या मागं एक गोष्ट असते, लोक काय म्हणतील? मी दहा वर्षे संसार करून बायकोला सोडलं, तर लोक काय म्हणतील? मी माझी जमीन विकली, तर लोक काय म्हणतील? बँकेनं लिलाव काढला तर लोक काय म्हणतील? मी नापास झालो तर लोक काय म्हणतील..? लोक काय म्हणतील, या एका विचारानं माणसं आधीच निम्मी अर्धी मरतात, आणि याचा विचार करून करून मग एक दिवस खऱ्या अर्थानं मरतात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणतंही संकट हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नव्हे. आज आपल्याला जी दुःखं मोठी वाटतात ना, काही वर्षांनी तुम्ही पाहाल ना, तर ती तुम्हांला एवढी क्षुल्लक वाटतील की, तुम्हीच तुमच्यावर हसाल. आणि जे लोक स्वतःची प्रतिमा जपण्यात मश्गुल असतात तेचं लोक अमहत्येचे जास्त बळी ठरतात. जीवनापेक्षा त्यांना प्रतिमा जास्त महत्वाची वाटते. बाकी माणूस म्हणून सगळ्यांचे पाय मातीचेच! मला विचाराल, तर मी म्हणेन आत्महत्या हे कोणत्याचं समस्येचं उत्तर होऊ शकत नाही. तुमचं निर्भीड जगणं हे मात्र तुमच्या सर्वच समस्यांचं उत्तर ठरू शकतं…

  Reply
  • June 16, 2020 at 11:01 pm
   Permalink

   खरंच मार्मिक आणि परखड विचार व्यक्त केलेत तुम्ही, धन्यवाद

   Reply
 • June 16, 2020 at 10:13 pm
  Permalink

  ताई खूप छान आणि आजची नैराश्याची स्तिथी अशीच आहे लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात त्यामुळे आज कुणाजवळ आपलं मन मोकळं करताना हजारदा विचार करावा लागतो त्यामुळेच खूपदा लोक व्यक्त होत नाही आणि नैर्याश्याचे शिकार होतात.

  Reply
  • June 16, 2020 at 11:02 pm
   Permalink

   होय अगदी बरोबर

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami