आम्ही चौघी

कॉलेज सुरू होते.बाहेर पडताना आटो तुन काकू उतरल्या आणि पुढे चालत असताना त्यांना आवाज दिला.कशा आहात? कुठे चाललात? विचारपूस केली बोलून झाल्यावर नीता व तिचे बाळ कसे आहे ? असे विचारले , नीताचा विषय निघताच काकूंचा आवाज जड झाला. नीता महिनाभरापूर्वीच मरण पावली. असे सांगत अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हे ऐकून आम्हा मैत्रिणीला धक्का बसला आम्ही स्तब्ध झालो काही क्षणाने कांचन ने विचारले काय झालं?कसे झाले ? अशी खोलात विचारपूस केली.

डिलिव्हरी नंतर नीता सासरी गेली होती.सर्व काही ठीक चाललेले. घरात नवीन जीव आल्याने जावई नीता सर्व ठीक होते. बाळाच्या भविष्याविषयी स्वप्न रंगवत होते पण कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक पंधरा दिवसात तिची प्रकृती बिघडली उपचार, वेगवेगळ्या तपासण्या सुरू असतानाच तिने जगाचा निरोप घेतला तिने कोणाला सेवेची संधी दिली नाही .

आता बाळ मातेपासून पोरके झाले आहे. हे सांगत असताना आम्हालाही अश्रू अनावर झाले नीताच्या मृत्यूमुळे वडीलाला पण हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना भरती केले. त्यांच्यासाठी टिफिन नेत आहे. असे सांगतच अश्रू पुसतच काकू पुढे निघून गेल्या.

आम्ही नीता ,कांचन, रश्मी ,मीनल( काल्पनिक नाव) जिवलग मैत्रिणी अगदी प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सोबतच होतो तेही एकाच अभ्यासक्रमात. कॉलेजचे स्नेहसंमेलन, क्रीडा संमेलन किंवा अन्य कोणतीही स्पर्धा असो आमचा सहभाग असायचा त्यामुळे आम्हाला एकाच वेळी आवाज देताना चौघी असे एकेरी शब्दात हाक मारत आमच्या चौघीत पाचवी मैत्रिण कदापिही सामील झाली नाही .

पदवीच्या द्वितीय वर्षाला नीताला चांगले स्थळ चालून आले. त्यामुळे नीता च्या पालकांनी स्थळ निश्चित केले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मे महिन्यात लग्न ठरले होते आमची परीक्षा एप्रिलच्या शेवटपर्यंत आटोपली होती . त्यामुळे लग्न होई तोवर चौघी एकत्र होतो. लग्नाची खरेदी , लग्नाच्या कपड्यांची निवड, रंग आमच्याच पसंतीने घेतले होते. लग्न होईपर्यंत प्रत्येक वेळेच्या खरेदीला आम्ही सोबत होतो .

दिवसांमागून दिवस जात होते. लग्नाच्या तारखेचे काऊंनडाऊन सुरू झाले होते. जिवाभावाची एक मैत्रीण आपल्यापासून दूर जाणार याचे दुःख तर दुसरीकडे तिचे लग्न होत असल्याचा आनंद अशा दुहेरी मनस्थितीत तिच्या सहवासात दिवस घालवत होतो. गप्पागोष्टी त दिवस कसा जायचा कळत नव्हते. उद्या ला तिला हळद लागणार होती. परवा लग्न, म्हणून आम्ही तिच्याकडेच मुक्कामी होतो. नीताच्या प्रत्येक नातेवाईकांना हळद लावून आम्ही धमाल केली. दुसऱ्या दिवशी धुमधडाक्यात लग्न झाले. नीता सासरी गेल्यावर संसाराला लागली होती. त्यामुळे तिचे माहेर येणे कमी झाले होते. त्यामुळे आमच्या भेटी होत नव्हत्या.त्यानंतर तिच्या सातव्या महिन्यातच भेटीचा योग आला. यावेळी आम्ही मैत्रिणी पुन्हा एकत्र आलो. दोन महिन्याने निताने एका गोंडस मुलीला जन्म दिला ही मुलगी नीताची ट्रू कॉपी च होती.तिच्यासारखीच देखणी .अधून मधून आम्ही तिच्या भेटीला जात .महिनाभरानंतर मुलीचे बारशे झाल्यानंतर ती सासरी गेली व यावेळेस ही आमची शेवटची भेट ठरली इथून गेल्यानंतर महिन्याभरानेच तिने जगाचा निरोप घेतला. ती आमची मैत्री सोडून गेली होती.

काकूंच्या भेटीनंतर आठ दिवस आमची मैत्रीण गेल्याने आम्ही अस्वस्थच होतो.

आमचा अंतिम वर्षाचा निकाल आला होता. नीताने लग्नानंतर अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती.आम्ही चौघीही चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालो. नीता ही उत्तीर्ण झाली होती. परंतु आयुष्याच्या परीक्षेत अपयशी ठरली .

पदवीत्तर शिक्षण पूर्ण झाल्याने घरच्यांनी स्थळे आणणे सुरू केले होते.आमचे तिघीचेही लग्न उरकले, संसारात रमलो मात्र प्रत्येक दिवाळीला माहेरी आल्यावर एकमेकींना आवर्जून भेटायचो . संसाराच्या गोष्टी रंगायच्या परंतु लग्नानंतरची चौथी दिवाळी आम्ही दोघी मैत्रिणी ला धक्का देऊन गेली हा दिवस मनात कायमचा कोरला गेला. कारण त्या दिवाळीला कांचनचा दिवाळीच्या आठ दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. तिच्यावर भरपूर उपचार झाले .परंतु अखेरच्या स्टेपला कॅन्सर लक्षात आल्याने ती वाचू शकली नाही. ही दिवाळी आमच्या दोघींसाठी अंधकारमय ठरली. आजही दिवाळी आली की कांचनची आठवण येते.

आम्ही दोघी मैत्रिणी चे सासर एकाच जिल्ह्यात होते. त्यामुळे वर्षा ,दोन वर्षांनी आमची भेट होत, आजही भेटतो व या प्रत्येक भेटीत कांचन व निता ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकेकाळी महाविद्यालयात ‘आम्ही चौघी’ म्हणून वलय होते. यातील दोघी मैत्रिणी इतक्या लवकर कायमच्या सोडून गेल्या याचे आजही दुःख वाटते.

——————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami