माझा गुरु
गुरु विना ज्ञान नाही. गुरु विना आयुष्य म्हणजे दिशाहीन जगणे होय. योग्यवेळी गुरु मिळाला की ध्येय गाढता च येते. प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरुचे आगळे वेगळे स्थान असते.मग तो गुरु कुठल्याही रुपात असो,शाळेत शिकविणारे शिक्षक असो वा आई-वडील बहिण-भाऊ कुणी नातेवाईक, मित्र इत्यादी रक्ताचे अन् रक्ताचे नसलेले व्यक्तीही गुरूच्या स्थानी असू शकते. गुरु मुळेच आयुष्याला योग्य वळण प्राप्त होत असते. आयुष्य फुलवून टाकणाऱ्या गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय.
माझा पहिला व कायमचा गुरू माझी आई
काल-परवाच आईचा फोन आला होता. नेहमीच आई फोन करून हाल हवाल अन प्रकृतीची विचारपूस करीत असते. आणि प्रत्येक वेळी फोन ठेवण्याच्या आधी आधाराचे बोल देण्याचे ती विसरत नाही,आज मी ही आई झाली आहे.परंतू माझ्या आईसाठी मी अद्यापही लहानच आहे.तिचे धिराचे दोन शब्द मला माझ्या विचारांना संजीवनी देणारे वाटतात.
जन्मापासून आईच्याच संस्काराचे वर्तुळ राहिले आहे.त्यामुळे आताही माझा पहिला आणि कायमचा गुरू माझी आईच.
गर्भाशयापासून तिने संस्काराचे बाळकडू पाजले.आणि जन्मानंतर आद्यअक्षर तिनेच शिकवले.आई या शब्दानेच तिने मला बोलायला शिकविले.माझ्या आयुष्याची सुरूवातही तिच्यापासूनच झाली. एक एक पाऊल टाकत आधार घेऊन उभे होत असतांनाचे पाहून आणखी प्रेात्साहन देणारी तिच.कधी काळी तोल सांभाळतांना खाली पडल्यावर रडतांना पाहून हाताचे बोट धरून तिनेच समर्थपणे चालायला शिकविले.आधी तिने बोट धरून चालायला लावले,नंतर बोट पकडून जगात कसे वावरायचे हे शिकविले.तिनेच मला जगण्याची एक दृष्टी दिली.नंतर पुढे शाळेत जाण्याचे दिवस आल्यानंतर पुस्तकी शिक्षणाबरोबर ,मोलाचे शिक्षण दिले एक माणूस म्हणून जगण्याचे.
बालवय अल्लडपणाचे,परंतू तिचे उपदेशाचे डोजासह तिच्या वागण्या-बोलण्यातून आणि संस्कारातून मी एकेक गोष्टी शिकत गेली. माझ्यासाठी आई चे मन तिच्या सौंदर्यापेक्षाही जास्त सुंदर होते.शांत,सात्वीक,चेहरा आणि तेवढीच साधी, स्वच्छ व निर्मळ राहणी हे सर्व गुण आईमध्ये होते.तिच्या शांत व संयमी,हसमुख स्वभावामुळे घर नेहमी प्रफुल्लीत व फूलन जात असायचे.आजही तेच चित्र कायम आहे. तिला रागावतांना अनेक वेळा बघितले,पण तिच्या रागात कधी व्देष पाहिला नाही.तिने दोन धपाटे दिले ,पण त्यात वैताग कधी दिसला नाही.दिवसभर एकटीच काम करायची पण ती कधी थकतांना दिसली नाही.आमच्या घरी नेहमी पाहुणे असायचे.पण त्याचे स्वागत करतांना आम्हाला तिच्या कपाळावर कधी एकही आठी दिसली नाही. रात्री शेवटपर्यंत एकटीच पसारा सावरतांना उदास दिसली नाही.ती कधी झोपायची हे मला फार कमी वेळा माहित असायचे.तीच्या जेवनाआधीच मी जेवन करून झोपी जात असे.सकाळची शाळा असल्यामुळे.
एवढी सारी कामे करूनही जर आम्ही भावंडे आजाराने फणफणत असलो की,रात्र जागून काढायची.आणि सकाळी पुन्हा एका सैनिकाप्रमाणे दररोजच्या कामाला सज्ज असायची.कधी न थकणारी आई.एखाद्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे सतत प्रज्वलित असते.एवढी ऊर्जा,निर्गुण असणारी आई आजही सतत फ्रेश कशी राहते याचे गमक अद्यापही मला उलगडले नाही. दुखण्यामुळे अंथरूणावर जास्त वेळ ते राहत नसे .आजाराने कधी फणफणली नाही.दुखणे अंगावर झेलणारी ती कणखर आई.कधी काळी पोटदुखीने व्हीव्हणारी आई.. मात्र सकाळी पुन्हा नव्या दमाने ताठ उभी राहत असे. तिच्या वागण्या बोलण्यातून आम्हा तीन भावंडा वर संस्कार होत गेले.आज तिच्या संस्कारामुळेच आम्ही जीवनात खंबीरपणे उभे आहोत. एक माणूस म्हणून .
तिने साठी गाठली आहे. तिच्यात कधी स्वार्थपणा जाणवला नाही.कोणतेही नाते परके मानले नाही.तिने घरातील सर्वच सदस्यांना सारखे प्रेम दिले.त्यांनाही जपले..माझे सर्व काकाही आईच्या संस्कारात मोठे झाले.त्यामुळे त्यांनाही ती आईसारखीच वाटते. आज सर्व काका बाबा झाले आहेत.परंतू आईकडे आल्यानंतर आईपुढे लहानपण स्वीकारण्यात आनंद वाटतो. तिच्या मायेत कधीही भेदभाव नव्हता,आजही नाही.
तिने आपल्या आयुष्यात प्रत्येक नातं जीवापाड जपले आहे.त्यामुळे आजही पुर्वीसारखाच घरात गोतावळा आहे.आम्ही सर्व नातेवाईक जमलो की या गोकूळावर प्रेमाचा वर्षाव करीत असते.त्यामुळे घरात गोडवा असतो.नाती कशी जोपासाची तिच्या स्वभावातून आम्ही शिकतो. प्रत्येक नात्याना न्याय देणारी आई सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणारी आहे. आजही सगळ्यांनाच तिचा आधार वाटतो आणि मलाही.माझी आद्य गुरू असलेल्या आई बद्दल आणखी जेवढे लिहावे ,तेवढे कमी ठरणारे आहे.त्यामुळे गुरूपोर्णीमेनिमित्त माझ्या गुरूला दिर्घायुष्य लाभो,अशीच आरोग्यमय राहो, हीच सदिच्छा
मित्रांनो तुमच्याही आयुष्यात गुरु असेलच तो कुठल्याही रुपात,तुमच्या आयुष्यात तुम्ही गुरु कोणाला मानता याविषयी थोडक्यात तुमच्या गुरु विषयी आदर भावना.. कमेंट करून सांगू शकता .
धन्यवाद
ज्येष्ठ समाजसेवक सुभाष भाऊ शिंदे यांनी व्हाट्सअप वर व्यक्त केलेले मनोगत-
लेख खूप आवडला. सर्व प्रथम आई हीच गुरु असते. आणि तेही शेवटच्या क्षणा पर्यंत..
माझा गुरु हा वेळ आहे.
वेळ जस जशी येत गेली.
आणि त्या मुळेच मी बदलत गेलो.. वेळे लाच मी धन्यवाद देतो.आणि त्या मुळेच मला आज जे काही प्राप्त झालं आहे.ते फक्त वेळा मुळे. समोर वेळ कशी येईल सांगता येत नाही. पण चांगलीच येईल असा मी आशावादी आहे.
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा