आठवणीतील सर्कस

भला मोठा गोलाकार तंबू,आतमध्ये बसण्यासाठी गोलाकार लाकडी पाट्या,वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज,डरकाळी,वर एका झुल्यावरून दुस-या झुल्यावर कसरत करीत उड्या घेणा-या भरजरी पोषाखातील रशियन गो-या मुली आणि अधून-मधून कृप्त्या करणारा जोकर.असे सर्कसमधील चित्र. सर्कस तीन तास चालणारा निखळ मनोरंजन व साहसी खेळ होता.त्यामुळे बालकापासून तर वृध्दापर्यंत सर्वच जण एकाच रांगेतून पाहू शकणारा हा खेळ .शहरात सर्कसीचा मुक्काम दोन ते तीन महिने राहत असे.सर्कसीमध्ये रात्रीच्या खेळात दिसणारे घोडा,ह्ती,कुत्रा,आणि उंट हे दिवसांनी गावाजवळ चरायला आल्यावर त्या प्रत्यक्षात पाहायला वेगळाच आनंद .

शेवटची सर्कस बऱ्याच वर्षापुर्वी पाहिली कुटूंबासह. ,नाव आठवत नाही,लग्नानंतरही एक सर्कस बघितली.आफ्रीकन मुलींचा समावेश असलेली सर्कस होती. या सर्कसीचा पसारा कमी होता.जेमतेम 100 ते दीडशे प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असणारी लाकडी पाटी व लोंखडी खुर्ची होत्या. प्राणी संरक्षण कायद्याच्या अटीमुळे, सर्कसीत प्राणी कमी होते.हत्ती,घोडे आणि उंट एवढेच मोजके प्राणी,त्यांच्या जोडीला रंगबिरंगी पोपट,कबुत्तर होते.आज एकवीसाव्या शतकाच्या मोबाईल.टि.वी.च्या जमान्यात सर्कसीचा प्रेक्षकही कमी झाला होता.एका शोला हाऊसफुल गर्दी जमविणे खुप कठीण. त्यामुळे तीन शो वरून सर्कस आता केवळ दोन खेळावरच आली आहे.सर्कसीमधील वाघ,सिंह,रिंगमास्टर आता राहिले नाही. या शिवाय गो-या सुडोल रशियन मुलींची जागा आफ्रीकन मुलींनी घेतली होती.या जाडजूड आफ्रीकन मुलींचा बेली डान्स..नावाचे नृत्य सर्वानाच आर्कषण करणारे. तंबूच्या मधल्या भागात जाळीचे बांधून वर दोन्ही परस्पर विरोधी टोकावर झुला पकडण्या-या मुलीसह अन्य कलावंत आजही हद्याचा ठोका चुकवितात. दोरीवर चालत डोक्यावर कपकशीचा तोल सांभाळत चालणा-या मुलीचे कसब अनेकांना भुरळ पाडणारे ठरत. त्यात अधून मधून फटके खाणारा जोकर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.तीन तासावरची सर्कस दोन ते अडीस तासावर आली आहे.सर्कसीमधील परिवारही कमी झाला आहे.महागडा खर्च,मोठे मैदान,प्राणी संरक्षण कायद्याचे बंधन आणि प्रेक्षकांची रोडवत असलेली संख्या या मुळे सर्कस वर अवकळा आली आहे.आता लहान सर्कसलाही घरघर लागली आहे. तेव्हा पासून शहरात सर्कस आली नाही.नवीन पिढी सर्कस च्या मनोरंजन ,कसरतीच्या खेळापासून अनभिज्ञ आहे.

बालपणी पाहिलेली सर्कस आजही स्मरणात आहे.,दी ग्रेट रायल सर्कस,जेमिनी सर्कस चा दबदबा होता.येथील कलावंताचा रूबाबही वेगळाच होता. माझ्या लहानपणी शहरात सर्कस आली होती. सर्कस सुरू होण्याच्या आधीच तिचे बैनर गावातील भिंतीला चिपकावले गेले होते. त्यावर या तारखेपासून सुरू असे लिहिले जात असे. माझी पाचवीची परीक्षा आटोपली होती. यवतमाळात सर्कस सुरू होऊन वीस दिवस झाले होते. रात्रीच्या सुमारास वाघांची डरकाळी आणि संगीत ऐकू येत असायचे. त्यात आणखी आकर्षण म्हणजे खालपासून वर पर्यंत भला मोठा फिरणारा लाईटचा प्रकाश गावावर पडत असे. सर्कस आल्याचे ते प्रतिक होते. फिरणारा लाईट गावावरून फिरला की,मुले पुन्हा आईमागे सर्कस पाहण्याचा तगादा लावत असतात. आई मार्फत हा संदेश बाबापर्यंत पोहचत असे.

मे महिन्याच्या तिस-या रविवारला सर्कस पाहायला जाण्याचे ठरले होते.त्यामुळे आनंद गणनात मावेनासा झाला होता.जे मित्र –मैत्रिणी सर्कस पाहून आलेत ,त्यांना खास आवर्जून सांगत फिरायचो. आम्हीपण सर्कस पाहाचयला जाणार आहो.अखेर दिवस उजाडला सायंकाळी 6 वाजता जाणार होतो..मग चार वाजेपासून तयारीला लागली.अखेर दोन भावंडे,आई-बाबासह मी सर्कस पहायला गेली. मैदानाचा दुरून थाट दिसल्याने आनंद झाला.मैदानात प्रवेश केला. रविवार असल्याने गर्दी बरीच होती,बाबांनी तिकीट काढले.आतमध्ये शिरले.थेट खेळ दिसेल अशा ठिकाणी फळीवर जागा पकडली होती.खेळ सुरू व्हायचा होता,तोवर खालपासून तर वरपर्यंत काय –काय लावले आहे.हे पाहून घेतले.अधून-मधून सर्कसमधील माणसे व्यवस्था लावत होते.अखेर बेल वाजली आणि माझी उत्कंठा शिगेला गेली.भला मोठा पडदा उघडला आणि सायकलीवर पायापासून कपाळापर्यंत एकच रंग असलेल्या गो-या गोमट्या रशियन मुली,त्याचा सुडोल बांधा आणि त्यांची चपराई,व शारिरीक लवचिकता पाहून मनाला हायसे वाटले.गोलाकार त्ंबूत गोलाकार जागेत सायकल चालवित चालवित कसरत करीत होत्या.आधी एक,मग दुसरी,तिसरी ,चौथी मुली सायकलस्वार मुलींला लटकल्या होत्या.ती मात्र तोल सांभाळत त्याच स्पीडमध्ये सायकल चालवित होती.

मध्येच जोकर येऊन बाबासायकल चालवून प्रेक्षकांना हसविण्याचे काम करीत होता.एका मागून एक खेळ झाले. मध्येच पॉपकॉर्न आल्याने बाबांनी सर्वांसाठी पॉप कॉन विकत घेतले,इंटरवेलनंतर मात्र एका लोंखडी पिंज-यात दोन वाघ,दुस-या पिंज-यात सिंह ढकलत –ढकलत खेळाच्या जागी आले होते.तत्पुर्वी मात्र लोंखडी जाळी(सापळा) लावण्यात आला होता. त्यानंतर हातात चाबुक घेऊन आला तो रूबाबदार रिंगमास्टर.त्याने आल्या-आल्याने हातातील चाबुक पिंज-याला हाणला ,तेव्हा वाघाने त्यांच्या दिशेने डरकाळी फोडली.वाघांच्या आजावाने मी पाय जवळ घेतले. पिंज-यातील एक-एक प्राणि खाली उतरविण्यात आले.त्यानंतर रिंगमास्टरच्या इशा-याने उंच स्टयुलवर जाऊन बसले.चाबकाच्या इशाराने त्याने वाघ आणि सिंहाकडून खेळ व कसरती करवून घेतल्या.आणि प्राणी आपापल्या पिंज-यात जाऊन बसले.रिंगमास्टरने पिंज-याचे दार बंद केल्यानंतर जिवात जीव आला. सर्कसीमध्ये आम्ही पहिल्यांदाच वाघ,सिंह ,हत्ती,उंट प्राणी पाहिले होते.शेवटी लाल पिवळे,हिरवे भरजरी वस्त घातलेल्या एकापेक्षा एक सुडोल रशियन मुलीं आप ल्या कसरतीने आमचे डोळ्याचे पारणे फेडले होते.या मुलींच्या ,कसरतीने आणि साहसी खेळाने तंबूत टाळ्याचा गजर झाला. आणि शेवटी शो संपला आणि घराच्या दिशेने निघालो. कित्येक वर्ष ही सर्कस माझ्या आठवणीत राहिली.

सर्कसमध्ये जवळपास पाचशे प्रेक्षक बसण्याची व्यवस्था होती.त्यातील कलावंताची संख्याही मोठी होती.जवळपास 100च्या घरात ही संख्या होती.लहान बालकापासून तर ज्येष्ठ कलावंतापर्यंत,आर्केस्ट्रामधील कलावंत .जोकर,खेळाचे सामान उचलणारे आणि सर्कसमध्येच हयात गेलेले सर्वच जणाचे कुटूंब.सहसा सर्कसीमधील कलावंताचे विश्व सर्कसएवढेच असते. सर्कसमध्येच आलेल्या मिळकतीवर उदरनिर्वाह करीत असतात.सर्कस सोडून बोहरच्या जगात काम करून पैसे कमाविण्याच्या भानगडीत पडत नाही.जोकरला सर्कसमध्ये जेवढा सन्मान मिळतो.समाजात मात्र त्याच्या व्यंगावर हसणारेच जास्त मिळतात.

सर्कसचा मालक व त्याला हातभार लावणारे व्यवस्थापन,यांच्या भरोवश्यावर सर्कस सुरू असते.अनेकवेळा बाहेरच्या जगात जाऊन जीवन जगण्यापेक्षा सर्कसच्या कुटूंबात लग्न करण्याचा प्राधान्य देतात. प्राण्यांचा खाद्याचा खर्च,कलावंताचे मानधन,मैदानाचे भाडे,वीजेचे भाडे,जाहिरातीचा खर्च,आरोग्य सांभाळून मालकाला ब-यापैकी नफा होत होता.परंतू कालांतराने परिस्थीती बदलली.सर्कसीत प्राण्यांच्या वापरावर बंदी आली.तसेच लहान मुले ठेवण्यावरही बंदी आले.प्राण्यांमुळे सर्कसमधील आकर्षण लोप पावत गेले.अशाच मोबाईलवर खेळ मुलांचे मनोरंजन ठरले.प्रेक्षकही हळूहळू कमी झाल्याने सर्कसीचा कण कमकुवत होत गेला.आज तर सर्कस इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या आणि फेमस सर्कस केव्हाच मोडकळीस आल्या परंतू लहान आकाराच्या सर्कसही दुर्मिळ झाल्या आहे.समाजातल्या सर्वच वयोगटातील व्यक्तीसाठी मनोरंजनाचे माध्यम ठरणारी सर्कसीमुळे त्यावर मालिका व चित्रपटही काढल्या गेले.त्यामुळे सर्कस आता चित्रपट किंवा मालिका किंवा पुस्तकापुरतीच मर्यादित राहण्याची भिती व्यक्त होत आहे. अशी ही सर्कस पाहण्याचा अनुभव प्रत्येकालाच आठवत असेल.

One thought on “आठवणीतील सर्कस

  • July 12, 2020 at 7:42 am
    Permalink

    सर्व चित्र डोळ्यासमोर उभा राहाल आपण पाहिलेलि सर्कस आजच्या मुलांना दुर्मिळ दृश्य आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami