अतूट बंधन

कोरोनाचे जगावर आेढावलेले संकट,आणि लॉकडाऊन मध्ये अडकलेले आयुष्य.या चक्रव्युहातच आनंदाने जगण्याचे आणि स्वभावाला शिस्त लावण्याची आजची परिस्थीती. पंख अर्धवट खोलूनच आकाश निरभ्र असेल तेव्हा किंचीतशी भरारी घेण्याची वेळ.चारही बाजूनी परिस्थीतीने प्रत्येकालाच वेढले आहे. या परिस्थीतीतही सामर्थ्याने जगण्याची दिलेली परिस्थीतीने प्रेरणा अन शक्ती. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या इच्छा आकांक्षावर पाणी फेरले गेले आहे.उत्सव,सण केवळ घराच साजरे करण्याची वेळ आली आहे.

बहिण भावाच्या अतुट आणि पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षा बंधन होय.त्यामुळे नुकत्याच लग्न झालेल्या नववधूला माहेरची आस लागते ती रक्षाबंधन या सणाला माहेरी जाण्यासाठी मनाला होणारा हर्ष आणि कोण घ्यायला येणार,याची लागलेली उत्कंठा.माहेरी गेल्यावर आई-बाबा आणि भाऊ बहिण यांच्या भेटी मनाला वेड लाऊन जाते. लग्न होऊन गेलेल्या मुलीचा चेहरापाहून आईला शब्दाविनाच मुलीची अवस्था कळत असते.तीच्या चेह-यावरच ती सुख-दुख वाचत असते. लहान –मोठ्या भावालाही रक्षा बंधनाला बहिण येणार,या सुखद कल्पनेने तो मनस्वी सुखाऊन जातो.परंतू यंदा लग्न झालेल्या महिला माहेरी जाऊन रक्षा बंधन साजरा करण्याला वंचित राहण्याची शक्यता आहे ती कोरोनामुळे.अनेक बहिणी,भाऊ हे आज हॉटस्पॉट तर कुणी रेड झोनमध्ये आहे.त्यामुळे माहेरी गेले तरी क्वारंटाईनची भिती.या सर्व कारणांनी तिच्या मनाची घालमेल सुरू आहे.एकीकडे माहेरी जाऊन भावाला राखी बांधण्याची आेढ तर दुसरीकडे कोरोनाचे सावट.

कोरोना प्रादुर्भावामुळे दळणवळणाची साधनेही नाहीच्या बरोबरीत आहे. एस.टी.सेवा जिल्ह्यांतर्गत सुरू आहे.रेल्वे सेवाही सिमीत आहे.अशा वेळी भावाला राखी पाठवायची कशी?असा यक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला आहे.लग्नापुर्वी अगदी बालपणापासून भावाला राखी बांधत,परंतू आता लग्नानंतर पहिल्याच वर्षी भाऊ आणि बहिण्याच्या नात्यांच्या सणावर कोरोनामुळे विघ्न आले आहे.त्यामुळे यंदा सासरीच राहून भावाच्या आठवणीशिवाय दुसरा पर्याय नाही.

बहिण –भावाच्या सणाला ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे.भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करणारा,आणि दोन्ही नात्यांना परस्परांच्या कर्तव्याची जाण करून देणारा हा सण.वडिलासारखा गंभीरपणे बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा मोठा भाऊ,आणि बहिणीजवळ मन मोकळे करणारा लहान भाऊ ,अशी मनाची अन रक्ताची नात्यात बहिण आपल्या लहान भावाच्या पाठीशी आईप्रमाणे उभी राहते.ही नात्याची जोड व कर्तव्याची जाण शब्दाच्या पलिकडची आहे.

बहीण-भाऊ एकमेकांचे बळ असते. एकमेकांसोबत वावरतांना बहिण तापाने फणफणत असतांना रात्रभर जागणार भाऊ,आणि बहिणाला बरे व्हावे यासाठी मनोमन देवाकडे साकडे घालणारा भाऊ.लहान पणी तिला खेळण्यापासून तिचा प्रत्येक हट्ट पुर्ण करण्यापर्यत दादाची ती लाडकी छकुलीच असते.अगदी लग्नानंतरही.घरात आणलेला खाऊ आपल्या भावंडांसोबत वाटून खाणारी बहिण.

मला आजही आठवते, माझी एम. एस .डब्ल्यू.प्रथम वर्षाची वार्षिक परीक्षा होती. परंतु माझी तब्येत खूप खराब असल्यामुळे डॉक्टर ने सांगितलं परीक्षा देऊ नका ,पण माझा हट्ट होता की, मी अभ्यास पूर्ण केला आहे. त्यामुळे मी परीक्षा देईल म्हणून तेव्हा माझा दादा प्रत्येक पेपरला मला परीक्षा सेंटर वर घेऊन जायचा मी आत पेपर सोडवायची व तो कॉलेजच्या बाहेर तीन तास उभा राहायचा त्यामुळेच मी त्या वर्षी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. नाहीतर माझे ते वर्ष वाया गेले असते.अशा अनेक आठवणी मनात घर करून असतात. हि नात्यांची गुंफण मन हेलावणारी वाटते.

स्त्रीचे मन मुळातच हळवे,ती कितीही मोठी झाली तरी ती शेवटपर्यंत भावनात्मक राहते.ती सासरी असली तरी तिच्या माहेरा विषयीच्या भावना कायम राहते. स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर असो रक्षा बंधन आणि दिवाळी या उत्सवास तिच्या मनात माहेरची आस लागलेली असते. विवाहानंतर तिच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती,ऋणानुबंध तिच्या मनात कायमच्या कोरलेल्या असतात.मुलगी, बहिण ,पत्नी ,आई, सून अशा विविध भूमिकेत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते.त्यामुळे रक्षा बंधनास प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी अनेकवेळा राखी माहेरी पाठवून भावाच्या हाताच्या मनगटावर राखी पाहून आजही आनंदी होत असते. किंबहुना भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात तर कधी बहिण माहेरी येते.त्यामुळे रक्षाबंधन हा मने जुळवणारा सण आहे. पण आज कोरोना मुळे परिस्थिती थोडी वेगळी आहे.

One thought on “अतूट बंधन

  • August 3, 2020 at 9:15 am
    Permalink

    Happy Rakshabandhan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami